Here is the recipe for Tasty Mango Pickle
आंब्याचे मस्त लोणचे
आंब्याचे मस्त लोणचे
आत्ता परवा १३ जून ला मी लोणचे घातले ते असे-
- सर्वात पहिले एका मोठ्या कढईत सुमारे अर्धा किलो तेल तापवले,त्यात ३ खाण्याचे चमचे भरून मोहोरी टाकली आणि ती तडतडल्यावर २ खाण्याचे चमचे भरून हळद टाकली.gas बंद केला.ते तेल थंड होत ठेवले.
- ६ तळहाताएवढ्या जायंट खोबरी दळदार कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या पुसून मग खूप छान एकसारख्या फोडी चिरून ठेवल्या.एक किलो फोडी झाल्या.
- एका मोठ्या वाडग्यात एक वाटी भरून टाटा मीठ, अर्धी वाटी भरून लालजर्द तिखट,दीड वाटी भरून मोहोरीची डाळ,पाव वाटी भरून हळद पावडर घेऊन त्याचे आळे केले,म्हणजे त्याला वाडग्यात circular arrange केले.खाली आकृती दिली आहे.
- एका छोट्या कढईत एक चमचाभर तेलात आधी तीन खाण्याचे चमचे भरून मेथ्या तळून घेतल्या.त्या छोट्या खलबत्त्यात बारीक पण भरड कुटल्या.पुढे त्याच तेलात एक चमचा भरून हिंग पावडर तळून घेतली. त्याऐवजी हिंगाचा मोठा खडा तळून घेऊन त्याला कुटून घेता येतं.हिंग पावडर दोन चमचे घेतली तरी चालते.हे सर्वात आत छोटे आळे करून त्या आळयात ठेवले.
- मग एक पाव तेल आणखी वेगळ्या कढईत तापवले.त्यात २ खाण्याचे चमचे भरून मोहोरी टाकली आणि ती तडतडल्यावर २ खाण्याचे चमचे भरून हळद टाकली.gas बंद केला.ते कडकडीत तेल वाडग्यातल्या सर्व आळयात म्हणजेच सर्व मसाल्यावर एकसारखे पसरेल असे ओतले.दोन मिनिटांनंतर हा सर्व मसाला चमच्याने नीट कालवत बसले.तो थंड होत ठेवला.
- चीनी मातीची बरणी नीट पुन्हा एकदा घासून घेऊन कडक उन्हात ठेवली.(मसाला थंड होईपर्यंत कैरीच्या कोयी किसणीने किसून,त्या किसात साखर,किंचित तिखट घालून तक्कू केला.)ती बरणी कोरडी आहे हे पुन्हा तपासून आत आणली.
- आता मसाला पूर्णपणे थंड झाल्यावर कैरीच्या सुबक चिरलेल्या फोडी त्यात चांगल्या घोळल्या. चीनी मातीच्या बरणीत तळाशी थोडा मसाला घालून मग मसाल्यात घोळलेल्या फोडी बरणीत भरल्या.
- त्यावर सर्वात आधी केलेले मोठ्या कढईतले तेल ओतले.ते सर्व कोरड्या चमच्याने एकसारखे ढवळले.लोणच्यात कैरीच्या फोडी आणि मसाला नीट बुडून, वर एक बोट राहील,एवढ्या लेव्हल वर तेल आले पाहिजे.जर कमी वाटले,तर पुन्हा वेगळे तेल गरम करून,पहिल्याप्रमाणे मोहोरी आणि हळद घालून तेल तयार करून घ्यावे आणि संपूर्णपणे थंड झाल्याची खात्री करून घेऊन मगच लोणच्यात ओतावे.
- तेल मुळीच गरम राहता कामा नये.लोणच्याला कुठेही,कधीही ओला चमचा लागता कामा नये आणि पाणी तर मुळीच लागायला नको.
- मग त्यातले थोडे लोणचे वेगळ्या सटात((bowl ) कडून घ्यावे. बरणीचे झाकण बंद करून त्याला वर दादरा-म्हणजे स्वच्छ कापड वा रुमाल बांधावा आणि नाडीने घट्ट गाठ मारून बंद करावा.म्हणजे त्यात moisture जाणार नाही.
- मग हे तयार झालेले लोणचे वर्षभर टिकू शकते.पण त्याची खात्री यासाठी देता येत नाही,कारण ते इतके tasty रुचकर असते,की संपायला वेळच लागत नाही.-रश्मी घटवाई
मसाल्याचे आळे असे करायचे :